Recipes in Marathi only for Maharashtrian


Recipes In Marathi [ इडली-चटणी-सांबार ]

 


इडली -

इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या लागतात. पण इथल्या थंडीत पिठ अंबणे थोडे कठीण जात असे म्हणुन मग एकदा इडली रवा आणुन करुन पाहीले. ते पण नीट झाले. त्याच वेळेला थंडीमधे पीठ कसे अंबवावे याची एक 'ट्रिक' पण कळली ती पण इथे देतेय.

३ वाट्या इडली रवा

१ वाटी उडीद डाळ

कृती - डाळ आणि रवा धुवुन वेगवेगळे भिजत घालावे. ६ तासाने डाळ एकदम बारीक वाटावी. डाळ वाटुन होत आली की त्यात रवा घालुन वाटावे. फूडप्रोसेसर असेल तर त्यात घालुन थोडावेळ फिरवावे. पिठ साधारण भजीच्या पिठासरखे असावे. पिठ एका मोठ्या पातेल्यात काडुन त्यात १/२ कांदा घालुन पिठात बुडेल असा ठेवावा. त्यावर झाकण ठेवुन पातेले उबदार जागी ठेवावे. थंडीत साधारण १०-१२ तासात पीठ फुगुन येते. इडली पात्रात पीठ घालुन मोठ्या आचेवर कुकरमधे ठेवुन साधारण २० मिनीटे वाफवावे.

वर दिलेल्या प्रमाणाअत साधारण ४०-४५ इडल्या होतात.

टीप - पीठ ओव्हनमधे ठेवुन ओव्हनचा दिवा चालू केला तर ६-७ तासात पीठ अंबते.

चटणी -

१ जुडी कोथिंबीर निवडुन

२-३ हिरव्या मिरच्या

१ मुठ शेंगदाणे

१/४ वाटी ओले खोबरे

अर्ध्या लिंबाचा रस

१/२ इंच आल्याचा तुकडा

मीठ, साखर चवीप्रमाणे

कृती - वरील सर्व साहित्य मिक्सरमधे घालुन बारीक वाटावे. गरज लागली तर थोडे पाणी घालावे.

टीप - आवड असेल तर चटणीला हिंग, जिरे, मोहरी, कढिपत्त्याची फोडणी घालावी.

सांबार -

१ वाटी तुरडाळ

१ मोठा टोमॅटो

१ मध्यम कांदा

२-३ टीस्पून सांबार मसाला

मोठ्या लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन

चवीप्रमाणे मीठ

लाल मिरचीपावडर - चवीप्रमाणे

फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या

कृती - डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.

टीप - १. सांबारमधे आवडत असेल तर थोडा गुळ घालायला हरकत नाही.

२. सांबारमधे थोडे ओले खोबरे घातले तरी चांगले लागते.

 you might also like :-    भरली भेंडी

                                           

Post a Comment

Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP